Saturday, May 11, 2019

लग्नाचं आमंत्रण



त्याचं नाव ‘महेश कुलकर्णी’ हे लग्नपत्रिकेवर वाचलं तेव्हा मला कळलं. जेव्हा आम्ही जिममध्ये पहिल्यांदी बोललो तेव्हा मला वाटतं आम्ही एकमेकांना आपापली नावं सांगितली होती. पण जिममध्ये काय तो सकाळचा एक तास काढणार. माझ्याच वेळेला नियमित येणारे चेहरे बरेच असतात. काही स्मित करतात, नंतर रेस्टरूममध्ये गप्पाही होतात. पण सहसा नाव विचारायची कुणाला गरज वाटत नाही. आणि वय वाढतं तसं नावं लक्षात ठेवणं हा स्मरणशक्तीला मोठाच व्यायाम असतो - जिमच्या उपकरणांवर करता न येणारा. 
  
“माझ्या मुलीचं लग्न आहे. तुला पण एक मुलगी आहे ना” महेश म्हणाला. “तू, बायको, आणि मुलगी सगळ्यांनी यायचंच हं.” त्या पत्रिकेवर श्री व सौ आणि पुढे माझं नाव छापलेलं होतं. पत्रिका दोनशे पानांच्या कादंबरीएवढी जाड होती. वर गणपती तर होताच, पण एक रिबन बांधलेली होती. आम्ही जिमच्या बाहेर रस्त्यावर उभे होतो. महेश अतिशय प्रेमाने हसला. मी काही तिथे रिबन सोडली नाही, मात्र पत्रिकेच्या वेष्टनावर जिथे लग्न होतं त्या पंचतारांकित हॉटेलचा पत्ता स्पष्ट दिसत होता.

जिमपासून माझं घर दीड किलोमीटरवर आहे. ते अंतर चालताना मी फोन करतो नाहीतर विचार करतो. महेशचा निरोप घेऊन घरी चालायला निघालो तेव्हा मी विचार करायला लागलो. कधीकधी आपल्या नकळत नवे मित्र मिळत असतात. कुणाशी आपल्या वेव्हलेंग्थ जुळतील ह्याला काही गणित नाही. महेशला मी दीडदोन वर्षं बघत होतो, क्वचित बोलत होतो, प्रसंगी हसत होतो, पण आपल्या मुलीच्या लग्नाला मला बोलावण्याएवढी जवळीक त्याच्या मनात होती. निव्वळ एवढंच नाही, तर माझ्या कुटुंबाला बोलवून त्याने मैत्रीचा हात पुढे केला होता. मला भरून आलं. हल्लीच आमच्या एका ओळखीच्याने मुलाच्या लग्नाला स्वतःच्या भावाला आणि विधवा आईला बोलावलं नाही हे माझ्या कानावर आलं होतं. त्यांचं पटायचं नाही म्हणून. आणि इथे केवळ जिमच्या तुटपुंज्या ओळखीवर महेशने माझ्या कुटुंबाला पंचतारांकित हॉटेलमध्ये यायचं आमंत्रण दिलं होतं.  

मी घरी गेल्यावर बायकोला पत्रिका दाखवली. जिममधल्या मित्राने मुलीच्या लग्नाला आपल्या सगळ्यांना बोलावलं आहे, ताजमध्ये, मी म्हणालो.
आधी कधी ह्या मित्राचं नाव ऐकलं नव्हतं, बायको म्हणाली.
महेश चांगला माणूस आहे, प्रेमाने बोलावलंय. मी कधी त्याच्या मुलीला भेटलो नाहीये, पण लग्नात त्याच्या कुटुंबाशी आपली भेट होईलच, मी म्हणालो. महेशशी ह्यापूर्वी नुसती ओळख असली तरी भविष्यात चांगली मैत्री होईल ह्याची मला खात्री होती.

एवढ्या पंचतारांकित हॉटेलात बोलावलंय तर मग महेशच्या कुटुंबाला काहीतरी भेट द्यावी असा विचार माझ्या डोक्यात आला. खरं म्हणजे ‘आपली उपस्थिती हाच आमचा आहेर’ अशी ओळ पत्रिकेत होती. पण महेशने एवढ्या अगत्याने आम्हाला तिघांना बोलावलं होतं, ह्या हॉटेलांत जेवणाच्या किंमती काय असतात ह्याची मला कल्पना होती.  

आमच्या घराजवळ एक सिरॅमिक पॉटरीचा कारखाना आहे असं बायकोच्या कानावर आलं होतं. तिला अनेक दिवस तिकडे जायचं होतं. आपण जाऊ, आणि तुझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी काहीतरी भेट घेऊ, ती म्हणाली.

सिरॅमिक पॉटरी खरोखरच सुंदर निघाली. हा कारखाना नसून एक कलावंत बाई स्वतः भट्टीत वेगवेगळे सेट बनवत होती. ही हस्तकला असल्यामुळे बनवलेली प्रत्येक वस्तू वेगळी होती- जगात एकमेव. अर्थात त्यामुळे किंमतीही मजबूत होत्या.
‘ही प्लेट सुंदर आहे, मोठी आहे, फळं ठेवता येतील.” बायकोने सुचवलं. मी प्लेट उलटी करून पाठचा स्टिकर बघितला.  
“सहा हजार रुपये किंमत आहे.” मी म्हणालो.
“आता ताजमध्ये लग्न म्हणजे चांगली भेट द्यायला पाहिजे. छान आहे, आवडेल तुझ्या मित्राला, आणि त्याच्या मुलीला उपयोगी होईल.”
ती पॉटरीची मालकीण क्रेडीट कार्ड घेत नसती तर कदाचित मी ती खरेदी रद्द करू शकलो असतो. पण तिने कार्ड घेतलं. चांगल्या पॅकिंगचे आणखी दोनशे रुपये भरायला लागले.

दुसऱ्या दिवशी कामाला सुट्टी होती.
‘मला लग्नाला घालायला शर्ट नाहीये.’ मी बायकोला म्हणालो. तसं म्हटल्यास कपाटात वीस-पंचवीस शर्ट आहेत, पण त्यातले पंधराहून जास्त मला आवडत नाहीत, त्यामुळे मी ते कधी घालत नाही. एक-दोन बरे शर्ट आहेत पण त्यांना शोभतील अश्या पँट नाहीयेत. आणि जे शर्ट मी वारंवार घालतो ते आता जुनाट दिसायला लागले आहेत- ताजमध्ये नक्कीच शोभणार नाहीत.

मग आम्ही तिघे फिनिक्स मिलला गेलो. एकदा दुकानात गेल्यावर संयम राहत नाही. म्हणून मी माझ्या बायकोची आणि मुलीची प्रत्येक खरेदीला परवानगी घेतो. बायकोने आग्रह केला म्हणून एकाऐवजी तीन शर्ट घेतले.

‘आपण का इथे नेहमी येतो, आलोच आहोत तर घेऊन टाक.’  

मग मला अपराधी वाटायला लागलं. खरेदी हा बायकांचा व्यवसाय. मी बायको-मुलीला घेऊन आलो, आणि शर्ट मात्र मला घेतले. हे अगदीच चूक होतं. मग पुढचे दोन तास बायको आणि मुलीने खरेदी केली. मी काही बायकांच्या सेक्शनमध्ये जात नाही. तिथे ब्रेसियर वगैरे लटकत असतात, मला संकोच वाटतो.

सगळी खरेदी संपल्यावर, एवीतेवी फिनिक्स मॉलला आलोच होतो, म्हणून आम्ही इंडिगोमध्ये जेवायला गेलो. इंडिगो तसं खूप महाग, पण आम्ही क्वचित इथे येतो. त्यामुळे आज मेन्यूच्या उजव्या बाजूकडे न बघता ऑर्डर द्यायची असं ठरलं. जेवण झाल्यावर लगेच घरी जायला पाहिजे होतं. पण जेवताना माझा पाय टेबलाखाली बायकोच्या पायावर पडला.
‘तुझ्याकडे चांगले बूट आहेत की नाहीत?’ माझी सँडल फार लागली नसली तरी त्यामुळे तिला माझ्या बुटांची आठवण झाली.
‘आहेत ते ऑफिसचे काळे.’
‘आज घेतलेल्या त्या लिनेनच्या शर्टाखाली ते ऑफिशियल शूज चांगले दिसणार नाहीत. तुला नाहीतरी इनफॉर्मल शूजची गरज होती, आज घेऊन टाक. सगळीकडे हे सँडल घालून जातोस. चांगलं दिसत नाही.’
‘अग, मुंबईच्या हवेला हेच सोयीस्कर असतात.’ मी म्हणालो. मात्र मग क्लार्कचे शूज आणि दोन जोड्या घेतल्यावर तिसरी फुकट होती म्हणून मोज्यांच्या दोन जोड्या घेतल्या.  

‘ती आपण सिरॅमिक प्लेट घेतली ती ब्रेकेबल आहे का ग?’ मी विचारलं.
‘अर्थातच.’   
ती प्लेट ब्रेकेबल आहे हा विचार मला अस्वस्थ करत होता. कारण माझ्या डोळ्यांपुढे लग्नाचं दृश्य आलं. ताज हॉटेलमध्ये लगीनघाई, स्टेजवर अनेक लोक वधू वरांना भेटायला रांगा लावून उभे. माझ्या हातातली भेटवस्तू, मोठी, महाग, चांगली दोनशे रुपये देऊन पॅक केलेली, बघून महेश म्हणणार, अरे कशाला आणलीस, आहेर नको सांगितलं होतं. मग मी म्हणणार नाही रे हे केवळ टोकन म्हणून आहे. मग त्यात काय आहे हे माहिती नसल्यामुळे कोणीतरी ते पार्सल मागे फेकणार.

ही सगळी भीती मी बायकोला बोलून दाखवली.

‘लग्नात नक्की गळबटणार. एवढे लोक येतात. कुणाला कशाचा पत्ता नसतो. नंतर कुणी चोरून नेली तर तुझ्या ह्या मित्राला कळणार सुद्धा नाही.’

आम्ही फिनिक्स मॉलहून घरी पोचेस्तोवर मी ठरवलं होतं की आज संध्याकाळी महेशच्या घरी जाऊन भेट द्यायची. घरी द्यावी म्हणजे दिली हेही कळेल आणि सुरक्षितही राहील.
महेशचा पत्ता आमंत्रणपत्रिकेवर होताच. घराचा नंबर ४५०६ होता. त्या इमारतीच्या चौकीदाराने प्रश्न विचारले तेव्हा महेशचं घर पंचेचाळीसाव्या मजल्यावर असणार हे कळलं.
‘कृपा करून इंटरकॉमवर त्यांना फोन करू नका. त्याला सरप्राईज द्यायचं आहे.’ नशिबाने पत्त्यासाठी मी माझ्याबरोबर पत्रिका आणली होती. माझ्या बोलण्यावरून मी सभ्य माणूस असणार हे कळून चौकीदाराने फोन न करता मला सोडलं.

जिममध्ये सगळेजण टी-शर्ट आणि शॉर्ट घालून असतात, त्यामुळे कोण किती श्रीमंत (किंवा गरीब) आहे ते कळत नाही. महेशने घर उघडलं तेव्हा तो महाल वाटला. आत गेल्याबरोबर एका बाजूला अरेबियन समुद्राचं डोळे दिपवणारं दर्शन होतं. एवढ्या उंचीवर असल्यामुळे अख्खी मुंबईच जणू काही दिसत होती.
‘अरे, घरी आलास?’ नाईके शूज न घातलेला महेश पहिल्यांदीच पाहिला.  
‘रविवारी लग्नाला तुमची खूप गडबड असेल. त्यामुळे ही... हे... म्हटलं आज घरीच नेऊन द्यावं. त्यानिमित्ताने भेटही होईल तुझ्या घरच्यांची.’ मी सिरॅमिक प्लेटचं पार्सल त्याच्या हातात दिलं.  
‘अरे हे कशाला? आहेर नको म्हणून लिहिलं आहे.’
‘हे काही नाही... नुसतं टोकन आहे.’ म्हणून मी ते महेशच्या हातात कोंबलं. तो आत नोकराला पाणी आणायला सांगायला गेला तेव्हा मी ते पार्सल अलगद सोफ्यावर ठेवलं.
‘तू काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस. आज कुणीच घरी नाहीये. संयोगिता मैत्रिणींबरोबर बाहेर गेलीय. आशा पण खरेदीला गेलीय. रविवारीच लग्न आहे ना, त्यामुळे पळापळ चालू आहे.’ मी बसलो होतो, महेश उभाच होता.
‘नाही तुझी घाई असेल तर राहू दे, मी सहज आलो होतो. रविवारी आपली भेट होईलच.’ मी पाण्याचा ग्लास ठेवला आणि उभा राहिलो.
‘तुला कुठे सोडू का?’
मी नाही म्हटलं. महेश खूप चांगल्या कपड्यांत होता, आणि मी सँडल आणि माझ्या नेहमीच्या वापरातले विटके कपडे घालून आलो होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे जिममध्ये होतो. महेश दिसला नाही, माझी तशी अपेक्षाही नव्हती. दोन दिवसांनी मुलीचं लग्न असताना त्याने जिमला सुट्टी देणं स्वाभाविक होतं. फक्त तो आला असता तर कदाचित त्याने मुलीला आम्ही दिलेली सिरॅमिक प्लेट आवडली का नाही हे सांगितलं असतं.

नंतर ट्रेडमिलवर पळून झाल्यानंतर शरीराभोवती टॉवेल गुंडाळून मी रेस्टरूममध्ये बसलो होतो. अचानक मला कोपऱ्यातल्या टेबलावर पत्रिका दिसल्या. रिबन बांधलेल्या, वर गणपतीचं चित्र असलेल्या जाडजूड पत्रिकांचा एक जुडगा तिथे होता.  बाजूला जिमचे दोन ट्रेनर बसले होते.

‘ह्या पत्रिका इथे काय करताहेत?’ मी त्यांना विचारलं.
‘तो मेंबर येतो ना, काय रे नाव त्याचं, महेश ना, त्याने ठेवल्याहेत, जिममधल्या सगळ्यांना वाटायला सांगितल्या आहेत.’
‘अरे व्वा’ मी म्हणालो. ‘तुम्ही जाणार का?’
‘काय नाही. माझी काय तशी ओळख नाही. उगाच कुणी बोलावलं म्हणून आपण जात नाही.’ एक ट्रेनर म्हणाला.

‘अहो, हल्ली काय आहे माहिती आहे का? एक मेंबर मला सांगत होता.’ दुसरा ट्रेनर बोलता झाला. ‘मुंबईतले हे लग्नाचे मोठे हॉल असतात ना, त्यांना मिनिमम नंबरची गॅरंटी लागते. म्हणजे तुम्ही कमीत कमी दोन हजार लोकांचे पैसे भरायचे, मग दोन हजार लोक आले काय किंवा आठशे आले काय. मग हे ह्या मेंबरसारखे लोक खिरापतीसारख्या वाटायला लागतात पत्रिका, कारण तो नंबर व्हायला पाहिजे ना. हे सगळे उसने लोक त्या मोठ्या हॉटेलला जाणार, जेवणार, त्यांना वाटतं काय खर्च केलाय ह्या माणसाने आपल्यावर. पण ते खरं नसतं. ह्या नंबर बनवण्यासाठी बोलावलेल्या लोकांसाठी त्यांना एका दमडीचाही वेगळा खर्च येत नाही.

रवी 


No comments:

Post a Comment