मधे एकदा मामाच्या घरी गप्पा मारताना
अमेरिकेतल्या भारतीयांचा विषय निघाला. आमचे अनेक मित्र, अनेक नातेवाईक कधीचे
अमेरिकावासी झालेले आहेत. माझ्या आईचा चुलतभाऊ मला वाटतं १९७५च्या सुमारास गेला
असेल. तेव्हापासून जो अखंड प्रवाह सुरु झाला आहे तो आजपर्यंत. ही चर्चा चालू
असताना मला एकदम राम गोखलेची आठवण झाली. ‘आमच्या वर्गातला एक मुलगा तर १९७० साली
गेला होता.’ मी मामाला म्हणालो.
राम पहिली ते तिसरी माझा चांगला मित्र होता. घारे
डोळे, पिंगट केस, गोरा वर्ण ह्यामुळे तो युरोपियन वाटायचा. चौथीचं वर्षं नुकतंच
सुरु झालं होतं. एक दिवशी सकाळी प्रार्थना झाल्याबरोबर वर्गशिक्षक वर्गाबाहेर
गेले. तिथे कुणाशी बोलत असावेत. मग आत येऊन त्यांनी एक घोषणा केली: “एक बातमी आहे,
ज्याची आहे तोच तुम्हाला सांगील. ये रे आत.”
असं म्हटल्यावर राम गोखले आत आला. बोलताना त्याची
मान जरा उजवीकडे कललेली असायची. ती त्याची सवय होती. तशी मान कलवून तो म्हणाला:
“मी कायमचा अमेरिकेला चाललोय. आज तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायला आलो होतो.”
एवढंच.
ती दोन वाक्यं बोलून तो वर्गाबाहेर गेला.
आमच्यासाठी वर्गातला कुणीतरी अमेरिकेला जातोय म्हणजे काय आणि कायमचा जातोय म्हणजे
काय हे गूढ होतं. ते गूढ मनातल्या मनात दाबून आम्ही अभ्यासाला लागलो.
तो जून १९७०चा महिना होता. म्हणजे त्या घटनेला
जवळपास पन्नास वर्षं झाली. त्या दिवशी राम वर्गातून गेला ते त्याचं शेवटचं दर्शन.
त्यानंतर कधी त्याचं नावही निघालं नाही. मामाच्या घरून परत येताना मी विचार करायला
लागलो. काय झालं असेल रामचं? अमेरिकेला जाऊन त्याने काय केलं असेल? घरी येईपर्यंत
माझं कुतूहल बळावलं, शिगेला पोचलं.
मी वर्गातल्या दोन-तीन जणांना फोन केले. आठवतोय
तुम्हाला राम गोखले? चौथीच्या सुरुवातीला अमेरिकेला गेलेला मुलगा?
छे बुवा. हे नावही आठवत नाहीये आणि असा कुणी
मुलगा आपल्या वर्गात होता हेही माहित नाहीये. बऱ्याच जणांकडून हे ऐकल्यावर मला
एकदा वाटलं राम गोखले हा माझा भ्रम होता की काय? माझ्या कल्पनाशक्तीने निर्माण
केलेली व्यक्तिरेखा होती की काय?
मी इंटरनेटमध्ये त्याचा शोध करायचं ठरवलं. पण शोध
काय म्हणून करणार? त्याच्या नावाशिवाय आणि तो पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलाय
ह्याखेरीज माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. आणि राम गोखले ह्या नावाच्या शेकडो
व्यक्ती असतील. शोध कसा करायचा? अश्या वेळी मी शेरलॉक होम्सची टोपी धारण करून
विचार करायला लागतो.
अमेरिकेला गेल्यानंतर रामने नावाचं स्पेलिंग
नक्कीच बदललं असणार. कारण इंग्लिशमध्ये Ram चा अर्थ बोकड असा
होतो. मी Raam Gokhale टाईप करून शोध सुरु केला. अहो आश्चर्यम्. पहिल्याच
फटक्यात रामचा बायोडेटा आणि फोटो सापडला. रामने गणित, तत्वज्ञान आणि
एक्च्युअरीच्या पदव्या संपादन केल्या होत्या, तत्वज्ञानावर अनेक पुस्तकं लिहिली
होती, Am I still me नावाची आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रकाशित केली
होती. ११ सप्टेंबर २००१ला तो वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३१व्या मजल्यावर काम करत
होता, आणि कष्टाने आणि नशिबाने वाचला होता. अडतीस वर्षं अमेरिकेत राहून आता पुण्याला
परतला होता, गरीब आणि गरजू मुलांना गणित आणि इंग्लिश फुकट शिकवण्यासाठी. मोठी सुरस
जीवनकथा होती ही. माझ्या स्मरणशक्तीत होता त्याहून फोटोतला राम अर्थातच वयाने मोठा
होता. तत्त्वज्ञाला साजेसं टक्कल कपाळाकडे पडायला लागलं होतं. मात्र डोळे तेच
घारे, आणि मान कललेली उजव्या बाजूला.
बायोडेटात पुण्याचा पत्ता आणि घरचा फोन नंबर
होता. लगेच मी तो फोन लावला. पन्नास वर्षांनी माणसाला शोधणं एवढं सोपं असतं?
फोन अस्तित्वात नव्हता असं एका गोड आवाजाने
सांगितलं. परत परत लावून तो एकच मेसेज ऐकू येत होता. मग मी इंटरनेटमध्ये पुण्याची
फोन डिरेक्टरी शोधली. इथे तुम्ही पत्ता टाकून फोन मिळवू शकता, किंवा फोन नंबर
टाकून पत्ता. तिथे कळलं की रामचा इंटरनेटमध्ये सापडलेला फोन काढून टाकण्यात आला
होता.
मग मी त्याच्या सोसायटीत (कुमार क्षितीज, साखर
नगर, पुणे) आणखी कुणी गोखले राहतात का हे डिरेक्टरीत शोधायला सुरुवात केली. कदाचित
रामचे कुणी नातेवाईक त्याच सोसायटीत राहत असतील. तसेही पुण्याच्या कुठल्याही
मोठ्या सोसायटीत एखादे गोखले असायला हरकत नाही. प्रयत्नांती मला कुमार क्षितीजमधले
आणखी एक गोखले सापडले. हा फोन कुणीतरी उचलला. तरुण स्त्रीचा आवाज होता.
मी माझं नाव सांगितलं. “मी राम गोखलेंना शोधतोय.”
मी म्हणालो.
“राम गोखले माझ्या सासऱ्यांचं नाव.”
मी मनातल्या मनात गणितं केली. म्हणजे रामने
बऱ्याच लवकर लग्न केलं, पहिला मुलगा झाला, आणि आता मुलाचं लग्नही झालं, झपाट्याने
काम करणारा दिसतोय राम.
“सासरे? आहेत का घरी?” मी विचारलं.
“ते... ते दीड वर्षांपूर्वी वारले.”
मी फोनवर बोलताना बाजूच्या कॉम्प्यूटर स्क्रीनवर
रामचा मोठेपणीचा फोटो होता. मी त्या फोटोकडे खिन्नपणे पाहिलं.
“कशाने गेला.... गेले... तुमचे सासरे...?” मी
विचारलं. (हार्ट? कॅन्सर? की काही अप्रचलित?)
“तसे शेवटी आजारी असायचे. वयाचा परिणाम. गेले
तेव्हा ८३ वर्षांचे होते.”
मी निधनाचा खुलासा ऐकून खुश झालो. पण ते दाखवू न
देता म्हणालो, “मी ज्याला शोधतोय तो राम गोखले ५७ वर्षांचा आहे. आपण अर्थातच
वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल बोलतो आहोत. तुम्हाला ५७ वर्षांचा राम गोखले माहिती आहे
का?”
“नाही.” ती बाई म्हणाली. “पण कदाचित माझ्या
सासूबाईंना माहित असेल. पण त्या आंघोळीला गेल्या आहेत.”
सासूबाई बऱ्याच वेळ आंघोळ करत होत्या. तिसऱ्यांदा
फोन केला तेव्हा फोनवर आल्या. त्यांनाही कुणी ५७ वर्षांचा राम गोखले माहिती
नव्हता. मग मी त्यांना पार्श्वभूमी सांगितली. हा मुलगा माझा वर्गमित्र होता,
पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला, आणि इंटरनेटमध्ये डी-१०२ कुमार क्षितीज
हा त्याचा पत्ता आहे, मी म्हणालो.
“अच्छा. आता कळलं. आम्ही दहाव्या मजल्यावरचे
गोखले, ते दुसऱ्या मजल्यावरचे गोखले. पण त्यांनी अनेक वर्षांपूर्वी घर सोडलं.
औरंगाबादला गेले. तुम्ही म्हणताय तो उषाताईंचा मुलगा असणार. अनेक वर्षं ते सगळे
अमेरिकेत होते.”
“त्यांचा औरंगाबादचा पत्ता? फोन? तुमच्याकडे....”
“तुम्ही उद्या फोन करा. माझ्याकडे उषाताईंचा
मोबाईल नंबर आहे कुठेतरी. शोधून देते तुम्हाला.”
काही दिवसांत नंबर मिळाला, पण उषाताई गोखले बहुधा
आंतरराष्ट्रीय रोमिंग न घेता परदेशी गेल्या असाव्यात. त्यांचा नंबर शेवटी एका
महिन्यानंतर लागला.
“मी रामला... तुमच्या मुलाला शोधतोय.” मी त्यांना
सगळं सविस्तर सांगितलं. राम पुण्यातच आहे हे त्यांच्याकडून कळलं. कृपा करून त्याला
ह्या फोनबद्दल काही सांगू नका. मला त्याला धक्का देऊ दे, मी विनंती केली.
*****
फोन रामनेच उचलला.
“राम, आपली ओळख नाही अशा शब्दांनी मी सुरुवात
करणार होतो.” मी म्हणालो. “मात्र ते अगदी
खरं नाहीये. आपण मित्र होतो – पन्नास वर्षांपूर्वी.”
त्यानंतर आम्ही अर्धा तास बोललो. एकमेकांच्या न
भेटलेल्या काळातल्या आयुष्याचा आढावा घेतला. पहिली संधी मिळताच पुण्याला किंवा
मुंबईला भेटायचं ठरवलं.
*****
राम गोखले खराच होता, माझा भ्रम नव्हता.
रवी